नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू

| काठमांडू | वृत्तसंस्था |

नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर एअर डायनेस्टीचे आहे. हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताबाबत पोलीस अधिकारी शांती राज कोईराला यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर शिवपुरी-7 जवळ कोसळले आहे. हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्तात समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोक ही मोठ्या संख्येने दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर रसुवाच्या स्याफ्रुबेसी येथे गेले होते. अपघातानंतर हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी आग लागली. बचावकार्य सुरू आहे. उड्डाणानंतर अवघ्या 3 मिनिटांतच हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 5 जण होते.

 या अपघाताबाबत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळानेही निवेदन जारी केले आहे. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टर उडवत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्रिभुवन विमानतळाच्या पूर्व भागात सौरी एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर हा अपघात झाला. या अपघाताचे कारण विमान धावपट्टीवर घसरल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विमान जमिनीवर आदळले आणि आग लागली. याआधी 1992 मध्ये याच विमानतळावर मोठा अपघात झाला होता, ज्यामध्ये 167 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version