ठाकरे गटाची चौकशीची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगर पालिकेत रस्ता बांधणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे जाळे असून, कामाचा दर्जा सुमार असल्याने येथील रस्ते 1 ते 2 महिन्यांतच खराब होत आहेत. तेव्हा येथील रस्ते बांधणीतील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि पर्यवेक्षक अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी महापौर नितीन पाटील यांच्याकडे केली आहे.
राजकारणी हस्तक्षेप करून अनेकदा अनुभवहीन कंत्राटदारांना मोठ्या निविदा मिळवून देत आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा घसरतो. कंत्राटदार आधीच संगनमत करून निविदा भरतात, त्यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शक न राहत भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे. डांबरी रस्त्याचे आर्युमान 15 वर्षे, सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे आर्युमान 30 वर्षे व पुलाचे आर्युमान 100 वर्षे गृहीत धरून संकल्पना करण्यांत आलेली आहे. परंतु, पनवेल महानगरपालिका अंतर्गत पावसाळ्यापूर्वी केलेले डांबरी रस्ते केवळ 1 ते 2 महिन्यातच खराब झाले आहेत. त्यामुळे या भष्ट्राचाराविरोधात शिवसेना (ठाकरे गट) संघटनेने आंदोलन करून पनवेल महानगरपालिकेला कुलूप लावले होते. त्यावेळी निकृष्ट कामांबद्दल कंत्राटदार व संबंधित पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यावर प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक होते. परंतु, पनवेल महानगरपालिकेने अधिकृत भूमिका आजपर्यंत स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भष्ट्राचाराला चालना मिळत आहे. तेव्हा शासन आदेशाचे पालन करून पालिका हद्दीत झालेल्या रस्ते बांधणी कामाच्या चौकशी करून ठेकेदार आणि सबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात यावी. त्याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील करदात्या जनतेच्या माहिती करीता खुलासा करावा, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी पनवेल महानगर पालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी पनवेल शिवसेना संघटक दीपक निकम, शिवसेनेचे नवीन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते.
