विमान मालकाच्या खात्यात कोट्यवधींचा व्यवहार
| मुंबई | प्रतिनिधी |
आ. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर गंभीर आणि खळबळजनक आरोप करत नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघाताच्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
अजित पवार यांच्या निधनाला तीन महिने पूर्ण होत असतानाच या प्रकरणात नवे धक्कादायक दावे समोर आले आहेत. आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघाताच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे आले असून, ते संबंधित यंत्रणांकडे सादर केले जाणार आहेत.”
कर्नाटकात दाखल झालेला एफआयर सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. रोहित पवार यांनी सर्वात मोठा आरोप करताना सांगितले की, “ज्या दिवशी अपघात झाला, त्याच दिवशी संबंधित विमान कंपनीच्या मालक व्ही.के. सिंग यांच्या खात्यात तब्बल 9 कोटी 81 लाख रुपये जमा झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच अंत्यविधी सुरू असताना 16 कोटी 88 लाख रुपयांची रक्कम जमा झाली.” एवढ्यावरच न थांबता त्यांनी दावा केला की, आतापर्यंत एकूण सुमारे 145 कोटी रुपये संबंधित व्यक्तीला देण्यात आले आहेत. या आर्थिक व्यवहारांमागचे नेमके कारण काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर त्यांनी या प्रकरणात काही संशयास्पद घडामोडींचाही उल्लेख केला. “काटेवाडी येथील घराबाहेर सलग तीन दिवस पूजा का करण्यात आली? 27, 28 आणि 29 तारखेला आर्थिक उलाढालीत अचानक वाढ का झाली?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी एका स्थानिक नेत्यावरही अप्रत्यक्ष आरोप केले. त्या नेत्याचे काही संशयित व्यक्तींशी आर्थिक संबंध असल्याचा दावा त्यांनी केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, “आम्ही कोणालाही सोडणार नाही. मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाला काय मिळणार?” या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि सर्व सत्य बाहेर यावे, अशी मागणी त्यांनी केली. या सर्व आरोपांमुळे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात नवे वादळ उठले असून, तपास यंत्रणांवर आता अधिक पारदर्शकपणे चौकशी करण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
