आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय तूर्तास रद्द
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेलकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्तावित निर्णय प्रशासनाने तूर्तास रद्द केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत नियमित सुरू राहणार आहे.
आगामी काळातील पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचे नियोजन केले होते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय स्थगित करण्यात आला असून, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले पाणीकपातीचे वेळापत्रक लागू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे पनवेल शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, भविष्यात पाण्याच्या परिस्थितीनुसार पुन्हा एकदिवसीय पाणीकपात लागू करण्याची आवश्यकता भासल्यास नागरिकांना आगाऊ सूचना देण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
