मुरुड नगरपालिकेत विहिरींचा महाघोटाळा; सुर्वेंनी केला गौप्यस्फोट

नगरपरिषद सीईओंचा अजब कारभार; आठ विहिरींसाठी केला समान खर्च

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

मुरुड नगरपालिकेने विहिरींचा गाळ उपसतानावर केलेल्या खर्चाची धक्कादायक माहिती समोर आली असून, किरकोळ खर्चाचे काम लाखो रुपयांवर नेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मुरुड शहरातील आठ विहिरींचा गाळ उपसण्यासाठी तब्बल 15 लाख 88 हजार 888 रुपये खर्च केल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. एका विहिरीच्या गाळ उपशासाठी 1 लाख 98 हजार रुपये खर्च झाल्याचा आकडा पाहता या कामाच्या खर्चावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विहिरीतील गाळ काढण्याच्या कामासाठी एवढा मोठा खर्च नेमका कशावर झाला? किती गाळ उपसला? काम प्रत्यक्षात किती झाले? आणि या खर्चाची पडताळणी कोणी केली? अशा प्रश्नांची उत्तरे आता मुरुडकरांना हवी आहेत. मुरुडचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुर्वे यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

विहिरींची स्वच्छता हा पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने आवश्यक विषय आहे. मात्र, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाचा खर्च पारदर्शक आणि पडताळणीयोग्य असणे तितकेच गरजेचे आहे. मुरुड नगरपालिकेने या आठही विहिरींसाठी मंजूर रक्कम, प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि खर्चाचा तपशील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विहिरीतील गाळ उपसण्याच्या नावाखाली मंजूर झालेला प्रत्येक रुपया कोणत्या कामासाठी वापरला जाणार, हे स्पष्ट झाले पाहिजे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या या कागदपत्रांमुळे मुरुड नगरपालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता प्रशासन या खर्चाचा सविस्तर हिशेब देणार का, याकडे मुरुडकरांचे लक्ष लागले आहे.

आठ विहिरींचा खर्च एकसारखा?
प्रशासकीय मान्यता आदेशातील कामांची यादी पाहिली असता भंडारवाडा, काळीवाडा, के.एन. कॉलेज परिसर, विश्रामबाग, मुस्लिम पेठ, मुस्लिम महिला समाज हॉल, दस्तुरी नाका आणि नगरपरिषद येथील विहिरीचा समावेश आहे. प्रत्येक कामासाठी 1 लाख 98 हजार 611 रुपयांची तांत्रिक मान्यता आणि उपलब्ध अनुदानातून तेवढीच प्रशासकीय मान्यता नमूद आहे. प्रत्येक विहिरीची खोली, व्यास, गाळाचे प्रमाण आणि गाळ बाहेर वाहून नेण्याचा खर्च वेगवेगळा असू शकतो. मग सर्व आठ कामांसाठी एकच रक्कम कशी निश्चित झाली? यामागे कोणते अंदाजपत्रक, दरपत्रक आणि तांत्रिक निकष वापरण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे नगरपालिकेने द्यावी, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी साहेब! चौकशी करा
मुरुडच्या विहिरींच्या गाळ उपसा कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे. आठ विहिरींसाठी प्रत्येकी 1 लाख 98 हजार 611 रुपये, अशी एकूण 15 लाख 88 हजार 888 रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती गाळ काढण्यात आला, कामाचे मोजमाप कसे करण्यात आले आणि प्रत्यक्ष किती निधी खर्च झाला, याचा तपशील जनतेसमोर येणे आवश्यक आहे. या प्रकरणाची तांत्रिक व आर्थिक पडताळणी करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी चौकशी करावी, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.
सीईओ नेटवर्क कक्षाच्या बाहेर
याबाबत नगरपरिषदेचे सीईओ सचिन बच्छाव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन नेटवर्क कक्षाच्या बाहेर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याप्रकरणात सचिन बच्छाव नेमका काय खुलासा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Exit mobile version