अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा

शेकाप नेते पंडित पाटील यांची मागणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले आहे त्याचे शासनाने तात्काळ पंचनामे करून सढळ हाताने मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे.
याबाबत कृषीवल जवळ संपर्क साधून पंडित पाटील यांनी म्हटले आहे की, गेली दोन वर्षे रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या महामारी नंतर निसर्ग चक्रीवादळ, त्योक्ती वादळ आलं होतं. त्यांनतर आलेल्या अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थिती यामुळे रायगड जिल्ह्यातील गरीब लोकांचे, शेतकर्‍यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी अनेक मंत्र्यांचे दौरे केले, वेगवेगळी आश्‍वासन दिले पण प्रत्यक्षात भरघोस अशी मदत काही मिळालेली नाही. त्यातच आलेल्या अवकाळी पावसाने जनतेची दिवाळी पण आज वाईट परिस्थितीत गेली. शेतातल्या भात पिकाच्या भरोशावर उधारीत लोकांनी दिवाळी साजरी केली. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास यावेळी पावसाच्या संकटामुळे हिरावून गेलेला आहे.
शासनाने नेहमीप्रमाणे गोल गोल उत्तरे न देता थेट वस्तुनिष्ठ पंचनामे करून सगळे नियम बदलून लोकांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतपीकाबरोबर बागायती, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे.याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Exit mobile version