‘माथेरान प्लास्टिक मुक्त करा’

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात आणि यातूनच जंगलात प्लास्टिक बाटल्या तसेच, अन्य प्लास्टिकजन्य कचरा इतरत्र टाकला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असून नाल्यात हा कचरा गेल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा स्रोत रस्त्यावरून वहात असतो. परिणामी, रस्त्यांची दयनीय अवस्था होत असते. यासाठी माथेरान प्लास्टिक मुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ठोस उपाययोजना केली पाहिजे, यासाठी येथील पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे यांनी मंगळवारी (दि.5) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

मागील काही वर्षांपासून कोकळे यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत गावातील अनेक भागातील प्लास्टिकजन्य कचरा गोळा करून नगरपरिषदेच्या ताब्यात दिला आहे. नुकताच त्यांनी जवळपास नऊ हजार पेक्षाही अधिक प्लास्टिक बाटल्या गोळा करून नगरपरिषदेकडे सुपूर्द केल्या होत्या. माथेरान पर्यटनस्थळ कायमस्वरूपी हरित आणि स्वच्छ असावे जेणेकरून इथे अधिकाधिक पर्यटक कसे येऊ शकतात आणि याच माध्यमातून सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

नगरपरिषदेच्या माध्यमातून पॉईंट्सचे दिशादर्शक नामफलक बनविले जातात त्यावर सुध्दा योग्य सूचना सूचित केल्यास याठिकाणी पर्यटक कचरा टाकणार नाहीत असे कोकळे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.

Exit mobile version