। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानया गावातील कचरा यामध्ये प्लास्टिक बाटल्या, कुरकुरे पाकीट, गुटख्याची पाकीटे, अन्य कचरा पर्यटक काही ठिकाणी कचराकुंडी नसल्याने जंगलात टाकतात. त्यामुळे इथली वनराई धोक्यात आली आहे. जर का इथली झाडीच नष्ट झाली तर याठिकाणी चिटपाखरूही फिरकणार नाही. माथेरान हे जिल्ह्यातील एक सुंदर रमणीय ठिकाण असून वर्षाकाठी जेमतेम शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध होत असतो. पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी आपल्या गावात मुख्यतः स्वच्छता असणे गरजेचे आहे.
त्यामुळे काही पर्यटकांकडून जंगलात टाकण्यात येणार्या कचर्यामुळे पर्यावरणाला हानी होऊ शकते. यासाठी राकेश कोकळे यांनी बुधवार (दि.12) रोजी आपले नेहमीचे सोबती करण जानकर, अर्जुन जानकर, पंकज कोकरे, प्रकाश मोरे, किशोर कासुर्डे, राजू जाबरे, शुभम सकपाळ, दिपक रांजाणे आणि आपला मित्र परिवार यांना सोबत घेऊन येथील प्रसिद्ध अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट परिसरातील शेकडो प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य प्लास्टिक कचरा गोण्यांमध्ये गोळा करून सुरक्षित ठिकाणी हलविला आहे.
कोकळे हे दरवर्षी पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा होते ज्या रस्त्यावरून पायी चालणे अथवा घोड्यावर पर्यटकांना नेताना घोड्याच्या पायाला दुखापत होत असते त्यासाठी योग्य ठिकाणी मातीचे बंधारे बांधले आहेत. पावसाळ्यात मातीची धूप होऊ नये यासाठी देखील ते आपल्या सोबत्यांसह सातत्याने प्रयत्नशील असतात.त्यांच्या या निस्वार्थी कार्याची पध्दत पाहून गावातील होतकरू तरुण स्वच्छता मोहिमेत पुढे येण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. अशा व्यक्तींच्या कार्यपद्धती मुळे आगामी काळात निश्चितच माथेरान हे खर्या अर्थाने स्वच्छता बाबतीत अग्रेसर राहील असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.