पेणला बाप्पांची हबनगरी बनवा; व्यावसायिकांची मागणी

| पेण | प्रतिनिधी |

पावणेदोनशे वर्षाच्या कालखंडात पेण तालुक्याचेे अर्थकारण हे गणपती कारखानदारीच्या भोवती फिरत आहे. असे असले तरी व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने गणपती कारखानदारीला राजाश्रय न मिळाल्याने या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळेच आजही गणपती मुर्ती निर्माण व्यवसाय आपल्याला विखूरलेला पहायला मिळतो. हा गणपती व्यवसाय एकाच इमारतीत आणायचा असेल तर पेणमध्ये गणपती हबची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत या व्यवसायातील व्यावसायिकांनी व्यक्त केले आहेत.

पेणमध्ये बाप्पांचे हब तयार झाल्यास सर्व गणपती कारखानदारांचे शोरूम एकाच इमारतीत येतील भक्तांना व मूर्ती विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना एकाच जागेवर वेगवेगळया डिझाईनच्या वेगवेगळया आकाराच्या गणपतीमूर्ती पाहता येतील. जेणे करून या गणपती कारखानदारीला उद्योगाचा दर्जा मिळेल. असे मत गणपती व्यवसायिक दिलीप लाड यानी व्यक्त केलेले आहे. पेण शहर आणि तालुक्यात आजच्या घडीला 40 ते 50 हजार कारागीर सतत 11 महिने या कारखानदारीमध्ये काम करून रोजगार उपलब्ध करतात. तसेच वर्षाला या व्यवसायामध्ये 500 कोटींच्या वर उलाढाल होत असल्याचेही त्यांनी लक्ष वेधले. भविष्यात हा व्यवसाय आणखी मोठया प्रमाणात व्हायचा असेल तर पेण शहरात गणपती हबची निर्मिती होणे गरजेचे आहे. अशी मागणीही लाड यांनी केली.पेण तालुका हे गणपतीमूर्तींचे माहेरघर असून शासनाने या व्यवसायाला उद्योगाचे स्थान दिलेले नाही,या व्यवसायाला एका छताखाली आणण्यासाठी गणपती हबची निर्मिती करावी. जेणेकरुन वेगवेगळेपण एकाच जागेवर गणपती व्यवसायीकांना व गणेशभक्तांना पहायला मिळतील व गणपती उद्योगाचे केंद्रीकरण होईल, अशी मागणीही लाड यानी यानिमित्ताने केलेली आहे.

आतापर्यंत अनेक उद्योगमंत्र्यांनी राणा भीमदेवी थाटात पेणला गणपतीचे हब निर्मिती करू अशा घोषणा केल्या परंतु आजतागायत त्या कृतीत उतरवल्या नाहीत. दोन वर्षापूर्वी तर पेण शहराच्या नाक्या-नाक्यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे बॅनर देखील लावण्यात आले होते. गणपती हबची इमारत कशी असेल याबाबत पेणकरांनी स्वप्न देखील रंगविले होते, पंरतु सत्ता जाताच घोषणा हवेत विरली.

दिलीप लाड, गणपती व्यावसायिक

पंचायत समितीची जागा उपयुक्त
पेण पंचायत समितीच्या बाजूला शासनाची मोकळी जागा आहे. त्याच जागेमध्ये जर गणपतीसाठी हब निर्मिती केली तर नक्कीच भविष्यात पेणच्या गणपती व्यवसायाला बरकत येईल. कारण शहराच्या नियोजन आराखड्यात रेल्वेला लागून ट्रक ट्रमिनल 210 सर्व्हे नंबर मध्ये जागा आरक्षित आहे. त्यामुळे कंटेनरच्या सहाय्याने गणपतीची वाहतूक रेल्वेने करता येऊ शकते. तसेच साधारणातः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर प्रसिध्द असे पूर्वीचे व्यापारी केंद्र अंतोरा बंदर आहे. त्यामुळे समुद्रामार्गी देखील आपण वाहतूक करु शकतो तसेच एसटी महामंडळाने महाकारगो वाहतूक सेवेची सुविधा देखील गणपती व्यवसायासाठी सुरु केली आहे. एकंदरीत पेण रामवाडी पंचायत समितीच्या बाजूला जर गणपतीचे हब तयार झाल्यास नक्कीच व्यवसायाच्या दृष्टीने गणपती कारखानदारांना फायद्याचे होउ शकते. मात्र शासनाने योग्यप्रकारे लक्ष देउन गणपती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देउन पेणमध्ये गणपतीचा हब निर्माण करावा. अशी मागणी गणपती कारखानदारांकडून होत आहे.

Exit mobile version