8000 मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट
| मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन 8 हजार मे. वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी राज्याची सध्याची वीज निर्मिती, कोळशाचा साठा, वीजेची आजची आणि भविष्यातील मागणी याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेतला. राज्यात मागील पाच दिवसापासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही ही चांगली बाब असून, अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मिती, कोळसा साठा, आयात कोळसा, वीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वीजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेणार असून घेण्यात आलेल्या निर्णयांचा कार्यपूर्ती अहवाल या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. केंद्र शासनाने 10 टक्के कोळसा आयातीला मान्यता दिली आहे, ही प्रक्रिया गतीने पूर्णत्वाला न्यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येणारा पावसाळा लक्षात घेऊन कोळशाच्या साठ्याचे नियोजन करण्यात यावे. राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने महानिर्मितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. उरण येथील गॅस प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बैठकीस उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, सीताराम कुंटे, आशिषकुमार सिंह, विकास खारगे, देबाशिष चक्रवर्ती, दिनेश वाघमारे, विजय सिंघल, संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
मागील पाच दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही
राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व मागील 5 दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नसल्याची माहिती उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. एकट्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वीजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून इतर 12 राज्यातही कोळशामुळे भारनियमन सुरु आहे. राज्याला होत असलेला अपुरा कोळसा पुरवठा व उन्हाळ्यामुळे मागणी वाढली असल्याने राज्यात दर दिवशी 2 हजार ते 2500 मे. वॅट ची तूट निर्माण झाली होती ती दूर करण्यात सध्या विभाग सध्या यशस्वी झाला आहे.
