आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील गर्भश्रीमंत म्हणून ओळखल्या जाणार्या जसखार गावात मलेरिया तापाचे रुग्ण आढळून येत असल्याने रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अॅक्शन मोडवर आले आहे.
जेएनपीए बंदर व इतर प्रकल्पांचा सर्वाधिक मालमत्ता कर हा उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीला मिळत असल्याने तालुक्यातील सर्वाधिक मालमत्ता कर मिळणारी गर्भश्रीमंत ग्रामपंचायत म्हणून जसखार ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र, ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यात या ग्रामपंचायत हद्दीत सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, मलेरियासारख्या आजारांनी त्रस्त झालेले रुग्ण आढळून येत आहेत.
जसखार गावात सध्या ताप, मलेरिया तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार करुन घेत आहेत. जसखार गावात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी तालुका आरोग्य विभाग सतर्क असून, रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. तरी रहिवाशांनी विशेष करून भाडोत्री रहिवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सुनीलराज साईनादंइ, सुपरवाझर तालुका आरोग्य विभाग कोप्रोली-उरण यांनी केले आहे.