सुरक्षिततेच्या कारणास्तव जाण्यास बंदी
| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील 38 प्रेक्षणीस स्थळांपैकी एक असलेला मालडुंगा पॉईंटची पायवाट खचली असून, माती वाहून गेली आहे. याच पायवाटेने पायथ्याशी राहात असलेले आदिवासी बांधव ये-जा करीत असतात. दरम्यान, ही माहिती माथेरान नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनला मिळतातच नगरपालिकेचे अभियंता अभिमन्यु येळवंडे, लेखपाल अंकुश ईचके, कार्यालयीन अधीक्षक प्रवीण सुर्वे, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत, पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार मुहापुळे, अर्जुन पारधी, ज्ञानेश्वर सदगीर, अमित भस्मा आदी कामगारवर्गासह घटनास्थळी दाखल होऊन जागेची पाहणी केली. त्यांनी पॉईंटचा रस्ता खचल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिली. मुख्याधिकारी गारवे यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा पॉईट बंद करण्याचे आदेश दिल आहेत. हा पॉईंट खचल्याने कुठलाही जिवीत हानी झाली नसली तरी वनराईचे मोठे नुकसान झाले. याचीदेखील पाहणी माथेरानचे वनपाल राजेंद्र आढे यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन केली.
माध्यमांतून याबाबत मंकी पॉईंट खचल्याच्या बातम्या येत होत्या. हे वृत्त चुकीचे असून, मंकी पॉईंट सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.