स्त्री-पुरुष गुणोत्तर 962 वरुन 966 वर

महिला मतदारांत वाढ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षण मोहीम घेण्यात आली. या माध्यमातून मतदारयादी तयार झाली असून, जिल्ह्यात 23 लाख 16 हजार 515 मतदार आहेत. त्यात पुरुष 11 लाख 78 हजार 55 व महिला 11 लाख 38 हजार 378 आहेत. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायटी यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष गुणोत्तर 962 वरून 966 इतके झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. गुणोत्तरातील हा बदल दिलासादायक आहे. या आकडेवारीवरुन लोकांमध्ये जागरुकता वाढल्याचे तसेच सरकारी उपक्रम योग्य दिशेने जात असल्याचे दिसून येते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचा कार्यक्रम वेगवेगळ्या स्तरावर घेण्यात आला होता. 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदारयादीत 58 हजार 503 मतदारांची नावनोंदणी झाली होती. अंतिम मतदारयादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ होऊन मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली. त्यात 82 तृतीयपंथ मतदारांचा समावेश आहे.

या कार्यक्रमामध्ये 18 ते 19 या वयोगटातील 13 हजार 440 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच 20 ते 29 वयोगटात 18 हजार 493 मतदारांची वाढ झाली आहे. अंतिम मतदारयादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 1.04 टक्के इतकी झाली आहे. ही वाढ झाली असली, तरीही समाधानकारक नसल्याचे जिल्हाधिकारी म्हसे यांनी व्यक्त केले. ही वाढ 4.61 टक्के असणे अपेक्षित होते. त्यामुळे याबाबत माहिती घेऊन नवमतदार वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

27 हजार मतदारांना ओळखपत्राची प्रतीक्षा
रायगड जिल्ह्यातील 79 हजार 998 मतदारांना ओळखपत्र देण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड स्वरुपाचे हे कार्ड आहे. सध्या 27 हजार 151 मतदारांना छपाई झाली नसल्याने ओळखपत्र देणे बाकी आहे. त्यामुळे लवकरच या मतदारांपर्यंत ओळखपत्र उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version