राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
| गोवा वृत्तसंस्था |
मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे गोवा येथे सुरू असलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्र अग्रस्थानी कायम आहे. हरयाणा आणि गतविजेत्या सेनादल यांना महाराष्ट्राच्या क्रीडापटूनी तोलामोलाची टक्कर देत मात केली आहे. महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 14 पदकांची लयलूट केली.
महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने निर्भेळ यश मिळवताना पाच सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली. कोमल वाकळेने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील महिलांच्या 87 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच तलवारबाजीत महाराष्ट्राच्या सॅब्रे संघाने रुपेरी यश संपादन केले. याचप्रमाणे पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकांची कमाई केली. महाराष्ट्राने शनिवारी 17 सुवर्ण, 8 रौप्य, 7 कांस्य अशा एकूण 33 पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खात्यावर आता 42 सुवर्ण, 25 रौप्य, 26 कांस्य अशी एकूण 94 पदके जमा आहेत.
पारंपारिक खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवताना महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात शनिवारी नऊ सुवर्णपदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. गुणवंत युवा खेळाडू शुंभकर, कृष्णा, दीपक, अक्षय आणि ऋषभने मल्लखांबमध्ये सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्राला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले. हीच लय कायम ठेवताना दीपक शिंदेने वैयक्तिक गटात विजेतेपदाचा पराक्रम गाजवला. तसेच याच गटात महाराष्ट्राचा शुभंकर खवले हा कांस्यपदक विजेता ठरला. रुपालीने महिलांच्या वैयक्तिक गटाचा किताब आपल्या नावे केला. महाराष्ट्र पुरुष संघ पहिल्यांदाच मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. या संघाने अंतिम फेरीमध्ये 128.70 गुणांची कमाई केली. स्वप्निल आणि प्रणाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले आहे. पुरुष गटात मध्य प्रदेश संघाने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच छत्तीसगड संघ कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्र पुरुष संघाने सांघिक गटात सर्वोत्तम कामगिरी केली. यामुळे संघाला हा सोनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.