2024 च्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र
| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिकच्या दिलीप महादू गावित याने पॅरा आशियाई स्पर्धेमध्ये मैदानी क्रीडा प्रकारात टी 47 श्रेणीतील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे दिलीप आगामी 2024 च्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असून त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे. दिलीप हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावरील खेळाडू आहे. उजव्या हाताने कोपरापासून तो दिव्यांग आहे. गत सात वर्षापासून नाशिकचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला क्रीडा कामगिरीसाठी दत्तक घेतले होते.
दिलीपच्या निवासासह स्पर्धेच्या आणि दैनंदिन सरावातील डाएटचा खर्चदेखील वैजनाथ काळे यांनी गत सात वर्षापासून केलेला आहे.आशियाई स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावल्यामुळे दिलीप हा 2024 मध्ये पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक या स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. त्यामागे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचे सात वर्षांपासूनचे मेहनत फळाला आली आहे. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे दिलीपने पॅरा ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारात 400 मीटरमध्ये भारताला कोटा मिळवून देत क्वालिफाय केले. त्यामुळे दिलीप आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पॅरा आशियाई स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दिलीपने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिलीपची कामगिरीची दखल घेत दिलीपची पोस्ट द्विटरवर शेअर करीत त्याचे अभिनंदन केले. त्याला 2024 मध्ये पॅरिसला होणाऱ्या पॅराऑलिम्पिकमध्येदेखील नाव झळकावण्याची संधी मिळणार असून ही बाब नाशिकसह देशासाठी अभिमानास्पद आहे.