। उरण । वार्ताहर ।
उरणमधील काही शैक्षणिक संस्थांमध्ये कमिटी सदस्य शैक्षणिक दर्जा सुधारण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संस्थेच्या काही जबाबदार सदस्यांनी या प्रकाराची माहिती ‘कृषीवल’च्या प्रतिनिधीला दिली आहे.
शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना, पालक आपल्या पाल्याला चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठ्या संघर्षाला सामोरे जात आहेत. मेरिटच्या आधारावर प्रवेश मिळणारे विद्यार्थी वगळता, इतर पालकांना लाखोंच्या डोनेशनचा बोजा सहन करावा लागत आहे. हा निधी संस्थेच्या अधिकृत जमाखर्चात नोंदवला जात नसून, कमिटी सदस्य स्वतःसाठी वाटून घेत असल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर संस्थेच्या काही कमिटी सदस्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने कमी किमतीत खरेदी केलेले भूखंड संस्थेला अव्वाच्या सव्वा किमतीत विकण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे समोर आले आहे. या गैरव्यवहाराला संस्थेतील काही सदस्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.
संस्थेच्या विश्वासार्हतेला तडा जाणार्या या प्रकारांमुळे शैक्षणिक दर्जा खालावत आहे. काही जबाबदार सदस्य या गैरव्यवहारांचा लवकरच पर्दाफाश करण्याच्या तयारीत असून, या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर कोणती कारवाई केली जाणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.