। उरण । वार्ताहर ।
अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पामुळे उरण तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासन उरण तालुक्यात महामुंबई शहराची निर्मिती करण्याचा घाट घालत आहे. एकंदरीत मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यातील जमिनींना सोन्याचा भाव प्राप्त होणार असल्याने जमीन खरेदीसाठी परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांनी आपला मोर्चा वळविला असल्याची चर्चा सध्या गावोगावी वर्तविण्यात येत आहे. तरी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी भविष्याचा धोका ओळखून खरेदी-विक्री झालेल्या जमिनींबाबत दस्तनोंदी करीत असताना त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला आहे कि, नाही तसेच तो बांग्लादेशीय नागरिक नाही ना, याची खातरजमा करण्याचे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी केले आहे.
अॅड. सत्यवान भगत यांनी उरण तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिलेल्या निवेदन पत्रकात म्हटले आहे कि, शासनाने तिसरी महामुंबई निर्मितीसाठी सिडको, नैना आणि एमएमआरडीएसारख्या प्राधिकरणांच्या माध्यमातून उरण, पेण, पनवेल तालुक्यात महामुंबई हे विकसित शहर बसविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे उरण तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सध्या जमिनीचे खरेदी व विक्रीचे व्यवहार तसेच बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. डेव्हलपर्स, बिल्डर, कंपनीधारक आणि कामानिमित्त परराज्यातून आलेले नोकरवर्ग यांची झुंबड गावातील दलालांना हाताशी धरुन जमिन-खरेदी करण्यासाठी जोरदार सुरू आहे.सध्या बघितलं तर खरेदी केलेल्या एका सातबार्यावर 15 ते 20 नावे असल्याची दिसत आहे.
तलाठी व मंडल अधिकारी यांनी आर्थिक संबंध न जोपासता, जनहिताच्या दृष्टिकोनातून विशेष जागरूक राहून शेतजमीन घेणारा हा शेतकरी आहे का? त्याच्याकडील शेतकरी असल्याचा दाखला सोबत जोडला आहे का? किंवा प्रांताधिकारी आमच्याकडून आदेश आणला आहे का? या सर्व गोष्टी तपासल्यानंतर सातबार्यावर नोंदी घालण्यात याव्यात. नाहीतर शेतजमीन खरेदी करणार्या परप्रांतीय व बांगलादेशी नागरिकांपासून भविष्यात उरणच्या जनतेला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मनसेचे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी व्यक्त केली आहे.