अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला 20 वर्षे कारावास

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष व अति सत्र न्यायाधीश शईदा शेख यांनी 28 जानेवारी रोजी2022 रोजी हा महत्वपुर्ण निकाल दिला. याबाबतचे वृत्त असे की, आरोपी परेश संजय मते याने दि. 11 मार्च 2021 रोजी पिडीता सोबत फेसबुकवर मैत्री करून सुरुवातीला तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फोनवरून तिच्याशी संवाद साधत आरोपीने पिडीतेला तिच्या अज्ञातपणाचा व एकटेपणाचा फायदा घेवून तिला तिच्या मर्जीशिवाय तसेच तिच्या आईवडीलाच्या कायदेशीर रखवालीतून आपटा फाटा येथे पळवून नेले. तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्याने चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेवून पिडीतेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात मुलीचे वय 12 वर्षांचे आहे हे माहित असून सुध्दा तिला आरोपीने पळवून नेले होते. आरोपी वरील आरोप न्यायालयासमोर सिध्द झाले आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपी परेश संजय मते यास 363, 354, 376 (2) (1) (प) तसेच पोक्सो कायदा कलम 3,4,5 (ल), 7, 8, 9 (ल), 10, 11, 12 व 15 या कलमांतर्गत प्रमाणे दोषी पकडून, पोक्सो कलम 2012 नुसार कलम 3 व 4 (2) प्रमाणे 20 वर्षांची शिक्षा व रक्कम रुपये 50 हजार रकमेचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील फिर्यादी पिडीतेच्या वडिलांनी पेण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक मिनल शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी जलदगतीने तपास पूर्ण केल्याने आरोपीला शिक्षा होऊ शकली.

Exit mobile version