| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
१७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष व अति सत्र न्यायाधीश शईदा शेख यांनी दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी महत्वपूर्ण निकाल दिला. या खटल्यात शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला. सदर खटल्यात आरोपी विवेक विजय गावंड यांच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होता. त्यातील पोक्सो कलम २०१२ नुसार कलम ३ व ४ प्रमाणे न्यायालयाने आरोपी विवेक विजय गावंड यास दोषी पकडून १० वर्षांची शिक्षा व रक्कम रुपये ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
थोडक्यात हकिकत अशी की, पिरकोन उरण येथील आरोपी विवेक विजय गावंड हा सराईत गुन्हेगार असून, तो विवाहित आहे. आरोपी विवेक गावंड याला मोबाईल फोनवर अल्पवयीन मुलींसोबत मैत्री करण्याची सवय असून या प्रकरणातील पिडीता हिच्याशी सुध्दा फेसबुकवर मैत्री करून सुरुवातीला तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फोनवरून तिच्याशी संवाद साधत आरोपीने पिडीतेला तिच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेवून तिला लग्न करण्याची फुस लावली. पिडीतेकडील सोन्याच्या दागिन्यांची माहिती करून घेतली.
आरोपीने त्यानंतर दि. ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी पिडीतेला खारपाडा येथे सर्व सोन्याचे दागिने घेवून बोलविले व तिला तिच्या मर्जीशिवाय तसेच तिच्या आईवडीलांच्या कायदेशीर रखवालीतून पिरकोन ता. उरण येथे पळवून नेले व सुरवातीला विश्वासाने पिडीतेकडील सर्व सोन्याचे दागिने स्वत:कडे काढून घेतले व नंतर तेथेच तिच्यावर एका भाडयाच्या रुममध्ये लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात मुलीचे वय १७ वर्षांचे आहे हे माहित असून सुध्दा तिला आरोपीने पळवून नेले होते हे न्यायालयासमोर सिद्ध झाले आहे. त्यानुसार न्यायालयाने आरोपी विवेक विजय गावंड यास भा.द.वि. ३६३, ३७६(२) (n). ४०६, ५०६, तसेच पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ कलमांतर्गत प्रमाणे दोषी पकडून,पोक्सो कलम २०१२ नुसार कलम ३ व ४ प्रमाणे १० वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये ५० हजार रकमेचा दंड व दंड न भरल्यास १ वर्षाची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
पिडीतेच्या वडिलांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तकार नोंदविली असता पोयनाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी. अतिग्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने हया केसचा तपास पूर्ण केले. या खटल्यात शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी एकूण १३ साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला.