| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला होता. मात्र पेण पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या तुकड्या करीत संपूर्ण पेण शहरात ऑपरेशन करीत अवघ्या काही तासात त्या आरोपीला पुन्हा जेरबंद केले आहे.
बिरू गणेश महतो असे या आरोपीचे नाव आहे. तो पाबल कार्ली येथे एका पोकलनवर मदतनीस म्हणून कामाला होता. पोकलन मशीन ऑपरेटर राजेंद्र चोलो यादाव वय ४२ वर्षे हा आरोपीत बिरू महतो याला पोलन मशीन ऑपरेट करताना तसेच जेवण बनविण्यावरून काहीना काही कारण काढुन त्रास देत असल्याने त्या गोष्टीचा त्याच्या मनात राग होता. तो राग मनात धरून आरोपी बिरू गणेश महतो वय १९ वर्षे रा. वार्ड क्र ९, रा.वार्ड क्र ९ कडूरुखुटा, पो. पॅक, ता. नावडीहा, जि. बोकारो, राज्य झारखंड याने जखमी राजेंद्र चोलो यादाव वय ४२ वर्षे याचे दोन्ही हाताचे पंजांवर, डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यास गंभीर दुखापती करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोकलन मालकाने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तो टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला. आणि पोलिसांचे लक्ष नसल्याचा फायदा घेवून त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. या प्रकारामुळे पेण पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला होता. आरोपीला शोधण्यासाठी आठ तुकड्या करीत पोलीसानी तातडीने कोंबींग ऑपरेशन सुरू केले. त्याला यश येत रविवारी रात्री दहा वाजता सदर आरोपी एका बँकेच्या आवारात लपून बसलेला आढलून आला. त्याला जेरबंद करीत पुन्हा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.