चार वर्षे पोलिसांना दिला गुंगारा; गोव्यात ओळख बदलून राहात असताना अटक
| पनवेल | प्रतिनिधी |
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करणाऱ्या श्रीमंत नागरगोजे याला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2016 मध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीने ओळख बदलून गोव्यात आश्रय घेतला होता. तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला 2020 मध्ये पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती.
सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेला श्रीमंत नागरगोजे ट्रेलरचालक म्हणून काम करत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी तो जेजुरी येथून पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीला ट्रेलरमधून पनवेल येथे घेऊन आला. येथे पत्नीचा गळा आवळून खून केला. हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र, या घटनेची साक्ष मुलगी देऊ शकते, या भीतीने त्याने तिचाही गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह उरण परिसरातील निर्जन ठिकाणी फेकून तो फरार झाला.
पोलिसांनी तपासादरम्यान आरोपीचा शोध घेतला असता तो गोव्यात असल्याची माहिती मिळाली. तेथे त्याने श्रीपाल यादव या नावाने ओळख बदलून हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम सुरू केले होते. पोलिसांनी पर्यटकांच्या वेशात गोव्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. या प्रकरणात न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड, कलम 201 अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, तर कलम 471 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड सुनावला. दंडाच्या रकमेतून 50 हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील यशवंत भोपे आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अंकुश कदम यांनी बाजू मांडली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दिवेळी यांनी तपास केला. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी रसिका राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
