मानिवली ग्रामपंचायतीचा कारभार अधांतरी…

प्रशासक पद रिक्त, ग्रामस्थांची कामे खोळंबळी

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील हुतात्मा हिराजी पाटील यांचे जन्मगाव असलेल्या मानिवली येथील गृप ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय राजवट आहे. सदस्य मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नेमले असल्याची घोषणा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून करण्यात आली. मात्र, 17 फेब्रुवारीपासून आजपर्यंत मानिवली ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक काही पोहचू शकला नाही, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांची कामे थांबून राहिली आहेत.

निवडणुका लांबणीवर पडल्याने तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीमध्ये रायगड जिल्हा परिषदकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सही असलेल्या पत्राने प्रशासक नेमले गेले. कर्जत पंचायत समितीमधील सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बस्टेवाड यांनी प्रशासक पदाची जबाबदारी दिली. त्यावेळी सर्व प्रशासक यांनी 17 फेब्रुवारी रोजी पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले होते. मात्र, बुधवारी (दि.6) उजाडला तरी मानिवली ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक म्हणून नेमणूक झालेले अधिकारी पोहचले नाहीत.

ग्रामपंचायतीमध्ये स्थानिकांची दैनंदिन कामे प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात आलेला अधिकारी कार्यालयात एकदाही पोहचला नसल्याने खोळंबून राहिली आहेत. त्याबद्दल मावळते सरपंच तुषार गवळी यांनी कर्जत पंचायत समितीमध्ये जावून तब्बल चार वेळा प्रशासक कधी येणार अशी चौकशी केली आहे. गटविकास अधिकार्‍यांनी मानिवलीमध्ये प्रशासक नेमलेले प्रमोद गायकवाड हे आजारी असल्याने ते रजेवर आहेत. त्यांच्या आजारपणाबद्दल आणि रजेबद्दल रायगड जिल्हा परिषद यांना कळविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासक नेमण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी हे एक एप्रिलपर्यंत रजेवर असल्याने मानिवली ग्रामपंचायतमधील प्रशासक पदाचा विषय तसाच भिजत राहण्याची शक्यता आहे.


जिल्हा परिषदेने स्थानिक पातळीवर कामे खोळंबून राहू नये, यासाठी तत्काळ नवीन अधिकारी यांच्याकडे प्रशासक पदाची जबाबदारी द्यावी.

तुषार गवळी, माजी सरपंच
Exit mobile version