अलिबागच्या मनश्री शेडगेचे चक दे!

महाराष्ट्राच्या हॉकी संघाच्या कर्णधारपदाची धुरा

। अलिबाग । भारत रांजणकर ।
कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या रायगडची आता नवीन ओळख करुन दिली आहे अलिबाग तालुक्यातील तिनवीरा या गावातील मनश्री नरेंद्र शेडगे हिने. मनश्रीचे नुकतीच महाराष्ट्राच्या हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला उत्साहाचे उधाण आले आहे. मनश्रीच्या या निवडीमुळे भविष्यात रायगडमधून राष्ट्रीय खेळ असणार्‍या हॉकीमध्ये स्वारस्य निर्माण होईल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.
अलिबाग तिनवीरा गावची युवा खेळाडू असलेलीमनश्री नरेंद्र शेडगे हि पहिल्या पासूनच अनेक खेळांमध्ये तरबेज होती. त्यामुळे शासनाच्या ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाअंतर्गत तीला हॉकी प्रशिक्षणाची संधी मिळाली, या संधीचे सोने कु मनश्री हिने केले आहे. त्यामुळे आज तीची महाराष्ट्र राज्याच्या महिला हॉकी संघात निवड होऊन कर्णधार पद तिला बहाल केले आहे. तिच्या वर दाखवलेला हा विश्‍वास म्हणजेच तिच्या या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल असल्याचे बोलले जात आहे. मनश्रीचे प्राथमिक शिक्षण चरी येथे झाले असून त्यानंतर ती पुण्यामध्ये पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिला हॉकीचे धडे मिळाले. महाराष्ट्राच्या कर्णधारपदी मनश्रीची निवड झाल्याची बातमी वार्‍यासारखी पोहचताच अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात समाजमाध्यमांवरुन मनश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे.

Exit mobile version