क्लब विश्वचषकात मँचेस्टर सिटी अजिंक्य

| सौदी अरेबिया | वृत्तसंस्था |

इंग्लंडमधील बलाढय फुटबॉल संघ मँचेस्टर सिटीने आपले वर्चस्व अधोरेखित करताना क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिटीने अंतिम सामन्यात ब्राझिलियन संघ फ्लुमिनेसेवर 4-0 असा विजय मिळवताना 2023 वर्षांतील आपले पाचवे विजेतेपद पटकावले.

अंतिम लढतीत मँचेस्टर सिटीने 40 सेकंदाच्या आतच आघाडी मिळवली. आघाडीपटू ज्युलियन अल्वारेझने हा गोल झळकावला. फ्लुमिनेसेचा कर्णधार निनोकडून 27 व्या मिनिटाला स्वयं गोल झाल्याने मँचेस्टर सिटीला 2-0 अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धापर्यंत ही आघाडी सिटीने राखली. उत्तरार्धातही फ्युमिनेसेला सिटीचे आक्रमण रोखता आले नाही. फिल फोडेनने 72 व्या मिनिटाला सिटीसाठी तिसरा गोल नोंदवला. तर अल्वारेझने 88 व्या मिनिटाला केलेल्या वैयक्तिक दुसऱ्या गोलमुळे सिटीला 4-0 अशी आघाडी मिळाली. अखेर याच गोलफरकाने सिटीने सामन्यात सरशी साधताना आपला पहिला क्लब विश्वचषक किताब जिंकला. मँचेस्टर सिटीने गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीगचे प्रथमच विजेतेपद मिळवले होते. यासह त्यांनी प्रीमियर लीग आणि एफए चषक या स्पर्धाही जिंकल्या होत्या. तसेच नव्या हंगामाच्या सुरुवातीला सिटीने सुपर चषकाचेही विजेतेपद मिळवले. 1 पेप गॉर्डियोला हे तीन वेगवेगळया संघांसोबत क्लब विश्वचषक जिंकणारे पहिले प्रशिक्षक बनले आहेत. यापूर्वी त्यांनी बार्सिलोनाला 2009 आणि 2011 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. तर 2013 मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली बायर्न म्युनिकने ही स्पर्धा जिंकली होती.

Exit mobile version