तब्बल 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, निवडणूक विभागाला जोडावी लागणार दोन बॅलेट युनिट
| रायगड | खास प्रतिनिधी |
लोकसभेसाठी अखेरच्या दिवशी तब्बल 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (दि. 19) अखेरपर्यंत एकूण 28 उमेदवारांनी 40 अर्ज दाखल केले आहेत. यातील काही उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली नाही, तर निवडणूक विभागाला दोन बॅलेट युनिट जोडावी लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाची सध्यातरी डोकेदुखी वाढली आहे.मतदान यंत्रे प्रतियंत्र केवळ 16 उमेदवार निवडी हाताळू शकतात. रायगड लोकसभेमध्ये तर, 28 उमेदवार आपले राजकीय नशीब अजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाची चांगलीच तांत्रिक अडचण होणार असल्याचे दिसते. बॅलेट युनिटवर उमेदवाराचे नाव, पक्षचिन्ह आणि एका बाजूला मतदारांना मतदान करण्यासाठी एक बटण असते. एका युनिटवर 16 उमेदवारांची मर्यादा असते. एका कंट्रोलिंग युनिटला 24 बॅलेट युनिट जोडण्याची सोय करण्यात आली आहे.
उमेदवारांची संख्या जितकी वाढेल, तितकी ती निवडणूक प्रक्रिया राबविणे कठीण जाईल. एकतर निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही. आयोगाला केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांकडून निवडणुकांची कामे करून घ्यावी लागतात. मतदान केंद्रावर एक केंद्राधिकारी, अधिकारी 1, अधिकारी 2 आणि एक कर्मचारी असे कर्मचारी लागतात. जर उमेदवारांची संख्या अधिक वाढल्यास कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागेल. त्याकरिता लागणारे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार का, असाही प्रश्न आहे.
निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येवर मर्यादा नाहीत. लोकशाही असल्याने संविधानातील सभागृहाच्या पात्रतेनुसार निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोकसभा निवडणुकीची अनामत रक्कम 25 हजार रुपये आहे. तर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना 12 हजार 500 रुपये आहे. ही अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करणे एका गावाला कठीण नाही. ही रक्कम आणि संविधानाने निश्चित केलेली लोकसभेची पात्रता पूर्ण करणारा मतदार उमेदवार बनू शकतो. वयाची 25 वर्षे पूर्ण करणारा भारतीय नागरिक उमेदवार म्हणून पात्र असल्याने उमेदवारांची संख्या मोठी राहू शकते. ज्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत आहे, ती व्यकती कोणत्याही घटकराज्यात लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा राहू शकतो. लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्याची नोंद होत असल्याने अनेकजण उमेदवार बनण्यास इच्छुक असतात.
पक्षाकडून उमेदवारी असेल तरच नामनिर्देशन दाखल करताना मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून एबी फॉर्म आवश्यक असतो. मात्र, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्मची आवश्यकता नसते.