अनेक सुविधांचा अभाव
| सोगाव | वार्ताहर |
मुंबई येथून पर्यटकांना व नागरिकांना जलमार्गाने कोकणात जाण्यासाठी जलद व सोयीचा मार्ग म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवा हे प्रमुख ठिकाण आहे. या ठिकाणाहून अलिबाग तालुक्यातील मांडवा, सासवणे, किहीम, वरसोली, आक्षी, नागाव या ठिकाणी समुद्रकिनारी तास ते दीड तासात जाता येते, तर मुरुड जंजिरा येथेसुद्धा जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने पर्यटक व नागरिक याचा वापर अधिक करतात. परंतु, मांडवा प्रवासी टर्मिनल जेट्टीवर अनेक समस्या व सुविधांचा अभाव असल्याने प्रवासी पर्यटक व नागरिकांकडून मुंबई पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड प्रशासनाच्या कारभावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
मांडवा जेट्टीवर दरवर्षी 15 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची चढ-उतार होत असल्याने व दररोज अजंठा, मालदार, अपोलो, पीएनपी या कंपनीच्या बोटींच्या सहाय्याने या मार्गाने हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत. परंतु, त्यादृष्टीने या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा या अगदी तुटपुंज्या व निकृष्ट दर्जाच्या आहेत. जेट्टीवरील असणारी पत्र्याची शेड गंजलेल्या व तुटण्याच्या स्थितीत आहेत. हे पत्रे वाऱ्याने निखळून प्रवाशांच्या अंगावर पडून मोठ्या अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. जेट्टीवर रांगेत उभे राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी आजारी रुग्ण, गरोदर माता, वयोवृद्ध यांना बसण्यासाठी कोणतीही आसन व्यवस्था नाहीत, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याने त्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जेट्टीवरील ठिकाणी प्रवाशांना मोफत पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने पाणी बाटली विकत घेण्यासाठी वाहनतळाकडील दुकानांकडे जावे लागते, यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच, शिवाय शारीरिक व मानसिक त्रास होतो तो वेगळाच. वाहनतळापासून ते जेट्टीवरील अंतर जास्त प्रमाणात असल्याने याठिकाणी अपंगांना, गरोदर माता, लहान मुलांच्या माता, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आदी शारीरिक क्षमता कमी व कमजोर असलेल्या प्रवाशांना चालत येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास होतो, शिवाय यांच्या सेवेसाठी असलेल्या वाहनांची संख्यादेखील फक्त दोनच आहेत, त्यादेखील सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण व अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना खूपच त्रास होत आहे. तसेच, ही वाहने वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. बोटीत बसताना व उतरताना अपंग व रुग्णांसाठी व्हीलचेअरची सुविधाही नसल्याने अशा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक समस्या मांडवा जेट्टी प्रवासी टर्मिनलवर असून, या समस्या व सुविधांकडे मुंबई पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड प्रशासन कधी लक्ष देईल, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.