पनवेलमध्ये रंगली मंगळागौर स्पर्धा

ममता प्रितम म्हात्रे यांचे यशस्वी आयोजन

| पनवेल | प्रतिनिधी |

हासरा, नाचरा.. सुंदर साजिरा श्रावण आला… याची प्रचीती पनवेलमध्ये महिलांनी घेतली. निमित्त होते ते जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित सखी मंगळागौर ग्रुप यांच्या नियोजनाखाली मंगळागौर स्पर्धेचे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये रविवारी (दि.20) पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी पनवेलसह, माणगाव, अलिबाग, श्रीवर्धनसह विविध ठिकाणाहून मंगळागौर स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून रंजना जनार्दन म्हात्रे, सुनीता पाटील, प्रज्ञा बारटक्के, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, पुष्पलता मढवी, डॉ. सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, प्रजोती म्हात्रे, शेकाप महिला आघाडी सरस्वती काथारा आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.

श्रावण महिना खऱ्या अर्थाने विविध सणांबरोबरच वेगळा आनंद घेऊन येतो. विशेषतः महिलांसाठी तो खूपच खास असतो. उपास-तापासाबरोबच या महिन्यात महिलांचे अंतरंग खुलून निघते. मंगळागौरीचा खेळ पुन्हा माहेरच्या अंगणात घेऊन जातो. मग तिथे सुरू होणारा सासर-माहेरचा खट्याळ खेळ संपूच नये असे वाटते. हीच मंगळागौरीची मजा अनुभवण्याची संधी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून ‌‘सखी मंगळागौर ग्रुप’ने महिलांना दिली आणि त्यांनीही या संधीचे सोने करत मनसोक्त झिम्मा-फुगडीचा आनंद लुटला.

इर्शाळवाडी दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीच्या मंगळागौर खेळाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. केवळ पारंपरिक खेळ न खेळता महिलांनी मंगळागौरीतून सामाजिक संदेश देत जनजागृतीचाही प्रयत्न केला. स्पर्धेचे परीक्षण मुग्धा लेले यांनी केले. अशाप्रकारे मंगळागौर स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रोत्साहन दिले गेले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नील ग्रुप खांदा कॉलनी, द्वितिय क्रमांक स्नेह ग्रुप दिवेआगर, तृतिय क्रमांक मनस्विनी अलिबाग यांनी पटकावला. तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उत्तेजनार्थ पारितोषिकेसुद्धा देण्यात आली.

यासह उत्कृष्ट पकवा पारितोषिक स्नेह ग्रुप दिवेआगरच्या स्वरदा दाबक व उत्कृष्ट गायिका पारितोषिक नारिशक्ती सोमजाई ग्रुप श्रीवर्धनच्या स्वरा पुलेकर यांना देण्यात आले. जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या ममता प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सखी मंगळागौर ग्रुप पनवेल यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे मंगळागौर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या असून, पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आलेल्या महिला स्पर्धकांनी आभार मानले.

Exit mobile version