माणगाव नगरपंचायत निवडणूक

चार जागांसाठी 16 अर्ज दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
येत्या 18 जानेवारी रोजी माणगाव नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागांसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत 4 जागांसाठी 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे सर्व अर्ज मंगळवारी (दि.4) झालेल्या छाननीत वैध ठरले असल्याची माहिती निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिली. माणगाव नगरपंचायतीत एकूण 17 वार्ड असून 17 नगरसेवक पदांची संख्या आहे. या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जागांकरिता मतदान झाले. उर्वरित वार्ड क्र.6, वार्ड क्र.8, वार्ड क्र.14, वार्ड क्र.17 या चार वार्डातील निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दि.21 डिसेंबरला मतदान घेण्याबाबत स्थगिती देण्यात आली होती. तदनंतर ओबीसींच्या या सर्व जागा सर्वसाधारण जागेतून लढविल्या जाव्यात असे आदेश न्यायालयाने देऊन त्यानंतर तसे आरक्षण निश्‍चित करून या चार जागांच्या निवडणुका दि.18 जानेवारी रोजी घोषित केल्या. या 4 जागांसाठी माणगावात राष्ट्रवादी काँग्रेस, माणगाव विकास आघाडी, मनसे, अपक्ष अशा एकूण 16 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केले. या चार जागांच्या मतदानानंतर दि.19 जानेवारी रोजी सर्वच 17 वार्डांतील मतमोजणी होऊन त्यानंतर माणगाव नगरपंचायतीवर कोणाची सत्ता हे स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version