माणगाव प्रीमिअर लीगला सुरुवात

माजी राजिप सदस्य अ‍ॅड. साबळे यांच्या हस्ते उद्घाटन

| माणगाव | प्रतिनिधी |

क्रिकेटचा महासंग्राम माणगाव प्रीमिअर लीग 2022 दुसर्‍या पर्वाला सोमवारी (दि. 5) सुरुवात झाली असून, ही स्पर्धा 11 डिसेंबरपर्यंत माणगाव मोर्बा रोड मार्गावरील अल्ताफदादा धनसे यांच्या मैदानावर रंगणार आहे. ही स्पर्धा संपूर्ण माणगावकरांची असून, या प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ लीगचे संस्थापक तथा राजिपचे माजी सभापती अ‍ॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी करण्यात आले.

या उदघाटनपर कार्यक्रमास माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, नगरसेवक कपिल गायकवाड, माणगाव शहर शिवसेनाप्रमुख सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते विरेश येरुणकर आदी मान्यवरांसह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सर्व संघांचे माणगाव प्रीमिअर लीग कमिटी अध्यक्ष निलेश केसरकर, सल्लागार भाई दसवते, मंगू जाधव, वैभव टेंबे, उपाध्यक्ष नंदुरज वाढवळ, बाळा पोवार, सचिव रोहित रातवडकर, सहसचिव फहद करबेलकर, खजिनदार राहुल बक्कम, सागर पाशिलकर, केदार जाधव, सदस्य निलेश उभारे, मुकुल मेहता, वैष्णव साठे, समीर महाडिक व सहकार्‍यांनी स्वागत केले.

या माणगाव प्रीमिअर लीगमध्ये एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत. नावाजलेले पंच, हिंदी व मराठीतून नावाजलेल्या समालोचकांकडून स्पर्धेचे धावते समालोचन तसेच युट्युब चॅनेलवरून दररोज स्पर्धचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. या लीगसाठी आकर्षक अशी बक्षिसे प्रथम सहा विजेत्या संघासाठी ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व चषक, द्वितीय 50 हजार रुपये व चषक, तृतीय 30 हजार रुपये व चषक, चतुर्थ 15 हजार रुपये व चषक, पाचवे 15 हजार रुपये व चषक, सहावे 15 हजार रुपये व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली असून, इतरही अनेक वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज एलईडी टीव्ही, उत्कृष्ट गोलंदाज एलईडी टीव्ही तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा मालिकावीर बक्षीस म्हणून मोटारसायकल दिली जाणार आहे. या प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेची जोरदार तयारी आयोजकांकडून करण्यात आली असून, संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष या प्रीमिअर लीगकडे लागून आहे.

Exit mobile version