माणगावचा खतनिर्मिती प्रकल्प रखडला

| माणगाव | सलीम शेख |

तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञ हि मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुक्याच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा घनकचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राउंड भागात हा कचरा ठिकठिकाणी टाकल्याने तो परिसरात पसरत असून या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जनावरे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. माणगाव नगरपंचायतीने खत निर्मिती प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र तो प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित राहिल्याने हा प्रकल्प कागदावरच राहिला आहे.

मागील माणगाव नगरपंचायत बॉडीने हा कचरा उचलण्यासाठी टेंडर काढून एका ठेकेदाराला हे काम दिले होते. त्यानंतर दरवर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे या कचरा सफाई व विल्हेवाट लावण्याचे टेंडर दिले जाते. त्याप्रमाणे हा कचरा ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे प्रयोजन त्यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीची नगरपंचायतीवरील सत्ता जावून शिवसेनेकडे ही नगरपंचायत आली. त्यानंतर ही नगरपंचायत आपल्या कार्यकाळात या कचऱ्याचे वर्गीकरण करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती प्रकल्प राबवील अशी आशा नागरिकांना होती. मात्र नगरपंचायतीकडून बाजारपेठेतील उचललेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. तो कचरा हवेने पसरला जातो. तसेच या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याने तो अन्यत्र हवेने तसेच गुरांढोरामुळे पसरून परिसरात रोगाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा जवळ आला असून नागरिकांचे तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी माणगाव नगरपंचायत या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे वर्गीकरण करून खतनिर्मिती करण्यासाठी कधी पाऊल टाकणार असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.

माणगाव नगरपंचायतीपुढे खतनिर्मिती प्रकल्पासाठी नवीन आव्हान उभारले आहे. या घनकचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावून या दैनंदिन गोळा केलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी महत्पपूर्ण पाउल टाकावे. अशी नागरीकातून मागणी होत आहे. या गंभीर व महत्वाच्या प्रश्नात नगरपंचायतीने लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यामुळे माणगावात डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे माणगाव स्वच्छ व सुंदर कधी होणार? हा प्रश्नच आहे. या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण सुका, ओला, व प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून माणगाव येथील नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणाऱ्या डंपिग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खत निर्मिती करावयाचे प्रयोजन होते. माणगाव नगर पंचायतीला डंपिग ग्राउंडच्या जागेची भेडसावणारी समस्या शासनाने सोडवली. त्यानुसार शासनाची पाच एकर जागा नगरपंचायतीला उपलब्ध झाली. असल्याचे समजते. मात्र हा कचरा उघड्यावर टाकल्याने कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून खतनिर्मिती प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभारले आहे.

Exit mobile version