रायगडात ‌‘अवकाळी’ने धास्ती

आंबा, सुपारी, वीटभट्टी व्यावसायिक चिंतेत; रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता

| चौल | प्रतिनिधी |

रायगडात मागील दोन दिवसांपासून अवकाळीचे संकट घोंघावत असून, आंबा, सुपारी आणि वीटभट्टी व्यावसायिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाचा रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने बळीरजा धास्तावला आहे.

मागील दोन दिवसांपासून हवामान सातत्याने बदल होत असून, आकाश काळवंडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. संपूर्ण राज्यात सोमवारपासून ढगाळ हवामानासह कमी-अधिक अवकाळी पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातही सोमवारी महाड, मुरुड, रोहा तालुक्याक अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. या अवकाळीचा हरभरा, पांढरा कांदा, मूग या रब्बी पिकांसह, भाजीपाला पिके आणाि मोहोरात असलेल्या आंबा, काजू बागंना फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकरी धास्तावले असून, भाताची झोडणी करून हातात येणारे भात घरी घेऊन जाण्याची लगबग सुरू आहे.

सुपारी व्यावसायिकांची तारांबळ

चौल परिसरात नारळी सुपारीच्या बागा  असल्याने व्यावसायिकही मोठ्या  संख्येत आहेत. ऑक्टोबरपासून या व्यापारात सुरुवात होते. येथील बागायतदारांकडून असोली सुपारी खरेदी करून तिच्यावर विविध सोपस्कार करून त्यातून रोठा काढण्यात येतो. त्याअगोदर ती सुपारी पाष्टून (सुपारीचे टरफल काढून) महिनाभर सुकवण्यात येते. सध्या लाखभर सुपारी शेतात सुकवण्यासाठी ठेवली आहे. पावसात भिजून नये यासाठी त्यावर प्लास्टिक कापड टाकून ठेवले आहे. सुपारी भिजल्यावर तिला बुरशी येण्याची शक्यता असून ती काळवंडून खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो, अशी भीती चौल येथील सुपारी व्यावसायिक राकेश पिळणकर यांनी व्यक्त केली.

अवकाळीच्या फेऱ्यात दरवर्षी वीटभट्टी व्यावसायिक अडकून पडत आहे. त्यामुळे यापुढे धंदा करायचा तरी कसा असा प्रश्न आम्हा व्यावसायिकांसमोर आहे. आमचे नुकसान झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई आम्हाला मिळत नाही. त्यामुळे धंदा करावा की नाही,  असा प्रश्न सतावत आहे.

महेंद्र घरत, वीटभट्टी व्यावसायिक,  चौल

शेतातील सोनं घरी आणण्याची लगबग

पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतातील मळण्या लवकरात लवकर उरकून वर्षभराच्या मेहनतून पिकविलेले सोनं आपल्या घरी आणण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.

Exit mobile version