आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा

Close-up of a single mango fruit ripening amongst lush foliage on tree in tropical climate. Horizontal format.

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

हवामानाच्या धोक्यापासून शेतकर्‍यांचे संरक्षण व्हावे यासाठी आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांनी गतवर्षी विमा उतरविला होता. भारतीय कृषी विमा कंपनीकडून हा विमा काढण्यात आला होता. मात्र, रायगड जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक 6 हजार 329 शेतकर्‍यांना अद्याप विम्याची रक्कमच मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे. फळ पीक उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

रायगड जिल्हयामध्ये 14 हजार हेक्टर आंबा उत्पादक क्षेत्र असून काजू लागवडीवरदेखील मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. जिल्ह्यातील तरुण मंडळीदेखील फळ लागवड करण्यावर लक्ष देत आहेत. या लागवडीतून उत्पन्नाचे साधन मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने आंबा लागवडीचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढण्याच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना कायमच बसत आला आहे. मोहर गळून पडणे, अवकाळी पाऊस पडणे अशा अनेक कारणांमुळे फळ पिक लागवडीवर परिणाम होतो. यामुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होते. फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीला रोखण्यासाठी शासनाने पुनर्रचित हवामान अधारित फळ पीक विमा उतरविण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडून विमा उतरविला. मात्र, जिल्ह्यातील नुकसान झालेल्या आंबा व काजू उत्पादक शेतकर्‍यांना अद्याप विमा मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक 6 हजार 135 व 194 शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

विमा कंपनीला पैसेही उपलब्ध झाले आहेत. मात्र, या कंपनीकडून अजून पंधरा दिवस विम्यासाठी वाट पहावी लागणार असल्याची माहीती खात्रीशीर सुत्रांकडून देण्यात आली आहे. विम्याबाबत माहिती घेण्यासाठी प्रभारी कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.

भातशेती विम्याकडे 22 हजार शेतकर्‍यांची पाठ
रायगड जिल्हयामध्ये भाताचे सुमारे 98 हजार हेक्टर क्षेत्र आहे. एक लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीसह अवकाळी पावसामुळे भात पिकांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी एक रुपयात विमा उतरविण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. यावर्षी फक्त 39 हजार शेतकर्‍यांनी विमा उतरविला. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी विमा उतरविण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी पेक्षा 22 शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
अधिकार्‍यांचा कारभार प्रभारीच्या भरवशावर
शासनाच्या जिल्हा कृषी अधिकारी तथा अधिक्षक बाणखेले यांची बदली होऊन अनेक महिने होऊन गेले आहेत. त्यांच्या जागी आत्मा विभागाच्या वंदना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यादेखील रजेवर गेल्या आहेत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कृषी विभागाचा कारभार उपविभागीय कृषी अधिकारी वानखेडे यांच्या भरवशावर चालू आहे. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली असून प्रभारी अधिकारी त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात की त्यांना शेतकर्‍यांचा फोन उचलायलादेखील वेळ मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.

पैसे मिळावे म्हणून सोमवारी राज्यातील कृषी सचिव जयश्री भोज यांना निवेदन सादर करून कोकणातील आंबा, काजू, बागायतदारांचे फळ पीक विम्याची भरपाई मिळावी यासाठी लेखी मागणी केली आहे.

– चंद्रकांत मोकल, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

Exit mobile version