अवकाळीमुळे आंब्याचा बाजार धुळीस

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यात असलेल्या खानाव व खांबेवाडी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक आंबा बागांमधील फळे झाडावरून खाली पडली असून, काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटल्या आहेत. तर, काही झाडे मुलासकट उपटली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

आंबे काढण्याची वेळ आली असताना, आता चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात कच्ची व तयार फळे गळून पडली असून, बाजारपेठेत विक्रीसाठी तयार असलेल्या आंब्यांचेही नुकसान झाले आहे. खानाव व खांबेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

तालुका कृषी अधिकारी आणि पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले नसले तरी त्यांना या नुकसान झाल्याची शेतकरी मंगेश धामणसे यांनी कल्पना दिली आहे. मात्र झालेल्या नुकसानीचे पंचनामे केव्हा होतील? केव्हा आर्थिक मदत मिळेल? यांची शाश्वती नाही. मात्र, या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Exit mobile version