बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादन घटले

| खारेपाट | वार्ताहर |
जागतिक हवामान बदलामुळे मागील 5/6 वर्षात कृषी फलोत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. कोकणाचा विचार करता याचा परिणाम आंबा व सर्व प्रकाराचा भाजीपाला त्याचबरोबर रब्बी मधील कलिंगड, खरबूज पिंकावर झाला आहे. त्यामुळे 50 ते 60 टक्के उत्पादन घटून ते 40 टक्क्यांवर येण्याची भीती आंबा उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. मुरुड तालुक्यातील उसरोली, वाळवटी, आदाड, वडघर व दुर्गम गावांतील गावामध्ये रब्बी मध्ये कलिंगड पिक मोठया प्रमाणवर घेतले जात आहे. मात्र दिवसेंदिवस या किड रोगांचा प्रादुर्भाव रोखणे अशक्य होत आहे. रासायनिक खतांचा देखील परिणाम होत आहे. माणगांव तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात देखील कलिंगड लागवड मोठया प्रमाणात आहे. मात्र सर्वत्र हीच समस्या भेडस्वात आहे. तापमान वृध्दीचा परिणाम सनस्ट्रोक मुळे सुपारी एवढे मोठे झालेले हापूस आंबे पडून त्यांचा बागांमध्ये खच पडलेला सर्वत्र दिसत आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गात निराशा पसरली आहे. भविष्यात आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचा वापर करुन निकोप उत्पादन कसे घेता येईल ? यासाठी चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा उत्पादक संघाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील व कोकणातील शेतकर्‍यांना सहकार्य करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काल आदाड ता. मुरुड येथे कृषी फलोत्पादन, सेंद्रिय, सिंचन यावर आधारित मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकर्‍यांना महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, पूर्वा एन्टरप्राईझेस चे संचालक जुगल ठक्कर, डॉ. तेजल ठक्कर, कपील ठक्कर यांचे हास्ते सेंद्रीय खतांचे ट्रायलसाठी सॅम्पल देखील वाटण्यात आले. मेळाव्यात तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

जागतिक हवामान बदलामुळे शेतकरी वर्गाचे होणारे नुकसान या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील व कोकणातील शेतकर्‍यांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दि. 11 मार्च 2023 रोजी माळी समाज हॉल नांदगांव ता. मुरुड जि. रायगड येथे कृषी फलोत्पादन सेंद्रीय प्रक्रिया सिंचन परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी यावेळी दिली.

Exit mobile version