रस्त्यासाठी कांदळवनांची कत्तल

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जेएनपीएने वनविभागाच्या मॅन्ग्रोज सेलकडे वर्ग करण्यात आलेल्या 815 जागेत खारफुटीची कत्तल करून अज्ञातांनी जवळपास 600 मीटरचा रस्ता बनवण्याचे काम सुरू केले आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र लघु पारंपरिक मत्स्य कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी उरण तहसीलदार, वनविभागाच्या मॅन्ग्रोज सेलकडे केली आहे.

पर्यावरणवादी संस्थांच्या संघर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जेएनपीएला मॅन्ग्रोज वनाची जागा वनविभागाच्या मॅन्ग्रोज सेलकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2021 साली जेएनपीएने 815 हेक्टर जागा वनविभागाच्या मॅन्ग्रोज सेलकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर या जागेला संरक्षित वनांचा दर्जा देण्याची मागणी पर्यावरणवादी संस्थांनी संबंधित विभागाकडे केली होती. मात्र, तीन वर्षांच्या पाठपुरावाही करूनही या जागेला संरक्षित वनाचा दर्जा दिलेला नाही, याबाबत पर्यावरणवाद्याचा संघर्ष सुरू आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अचानक वर्ग करण्यात आलेल्या 815 हेक्टर क्षेत्रावरील द्रोणागिरी नोड, जुना शेवा कोळीवाडा येथे शेकडो खारफुटीचे तुकडे करून 600 मीटर लांब व पाच मीटर रुंदीचा रस्ता बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बनविण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी लाखो खारफुटींची कत्तल करण्यात आली आहे. त्याशिवाय तलावही आंतरभरती संवेदनशील झोनमध्ये खोदण्यात आले आहे. या अनधिकृत कामासाठी मोठ्या डंपर आणि जेसीबी मशीनचा वापर केला जात आहे. यामुळे समुद्रकिनार्‍यावरील आंतर-भरतीचे क्षेत्र, खारफुटीचे जंगल हे माशांच्या प्रजातींचे प्रजनन आणि उगवणारे आणि पारंपरिक मासेमारी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे.

आधीच ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करीत आहोत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी मदत करण्याऐवजी प्रोत्साहन देत आहेत. त्यातच अज्ञातांकडून कांदळवनाची खुलेआम कत्तल करुन रस्त्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी तात्काळ फौजदारी कारवाई करुन जेसीबी, डंपरवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार, वनविभागाकडे करण्यात आली आहे.

नंदकुमार पवार,
अध्यक्ष,
महाराष्ट्र लघु पारंपरिक मत्स्य कामगार संघटना

Exit mobile version