शेकाप मेळाव्यात मणिपूर हिंसाचार तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या बेताल संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध ठराव करण्यात आला. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी हा ठराव मांडला. मणिपूर हिंसाचाराबाबत बोलताना त्या म्हणाल्या की,मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचार हा लांच्छनास्पद तसेच दुर्दैवी आहे. याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.मात्र याबाबत केंद्रातील भाजप तसेच मणिपूर सरकार काहीच बोलत नाही अथवा कारवाईही करीत नाहीत. याचा पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत, असे त्या म्हणाल्या.
संभाजी भिडेंवर कारवाई करा
महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करुन त्यांच्या सभांवर तातडीने बंदी घालावी,अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी निषेध ठरावाच्या निमित्ताने केली.महात्मा गांधी, महात्मा फुले ,पंडित नेहरु, लोकहितवादी, संत साईबाबा, संत कबीर यांच्याविषयी जाणूनबुजून अवमानकारक उद्गार काढून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम संभाजी भिडे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जावी, शिवाय त्यांच्या सभांवर बंदी घालावी, शिवाय यामागे कुणाची फूस आहे याचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई केली जावी,अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी निषेध ठरावातून केली.