मनमोहन सिंग यांची कारकीर्द

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. 1966 ते 1969 या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांत काम केले. नंतरच्या काळात ते केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदावर काम केले. 1996 साली सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर सिंग यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधानपद भूषवले. एप्रिल 2024 मध्ये त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

भूकबळी ठरू नये म्हणून खाद्य सुरक्षा कायदा
कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी खाद्य सुरक्षा कायदा त्यांनी केला. भूसंपादन कायदा तसेच वनअधिकार कायदा हीसुद्धा त्यांच्याच कार्यकाळाची देणगी. प्रत्येक ग्रामीण परिवाराला वर्षातून कमीत कमी 100 दिवस काम देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम त्यांच्या सरकारने आणला. त्यालाच आता मनरेगा या नावाने ओळखले जाते. गर्भावस्थेपासून माता आणि बाळाची काळजी घेणारी इंदिरा गांधी मातृत्व योजना त्यांनी आणली. आर्थिक मदत तसेच अन्य सामुग्रीची व्यवस्था त्यातून केली गेली.
मितभाषी, संवेदनशील आणि विद्वान नेते
मनमोहन सिंग तब्बल 33 वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे दहा वर्षे देशाचा राज्य कारभार सांभाळू शकले. विरोधकांकडून अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ले होऊनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते स्थिर राहिले. ते खर्‍या अर्थाने समतावादी, हुशार, प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान राहिले.
नोटाबंदीवरून मोदींवर साधला होता निशाणा
डॉ. मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या मुद्दयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. नोटाबंदी म्हणजे देशाची संघटित लूट असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर तत्काळ उपाय शोधायला हवा. नोटाबंदीमुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. छोटे उद्योजक आणि व्यापारी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले. रोजगार निर्मितीही थंडावली. नोटाबंदीच्या माध्यमातून 90 टक्के काळा पैसा परत पांढरा होऊन व्यवस्थेत आला. त्यामुळे नोटाबंदी ही एकप्रकारे देशाची संघटित लूटच आहे, असे त्यांनी म्हटले होते.

मनमोहन सिंग हे एक दुर्मिळ राजकारणी होते. त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासनाच्या विश्‍वालादेखील तितक्याच सहजतेने आपलेसे केले. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशसेवा, उत्तम राजकारणी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. मी देशाच्या महान सुपुत्रांपैकी एक अशा मनमोहन सिंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचे कुटुंब, मित्र आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते.

द्रौपदी मुर्मू,
राष्ट्रपती

माजी पंतप्रधान प्रतिष्ठत अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झाले. 1991 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त, देशाच्या आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार तथा एका गंभीर प्रसंगातून देशाला धैर्याने चालवणार्‍या मनमोहन सिंग यांनी विकास आणि समृद्धीचे नवीन मार्ग उघडले. अर्थव्यवस्थेबद्दलची त्यांची प्रगल्भ समज, सौम्य वागणूक आणि देशाच्या प्रगतीसाठी असलेली बांधिलकी माझ्या स्मरणात कायमस्वरूपी राहील.

जगदीप धनखड,
उपराष्ट्रपती

डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. कठीण परिस्थितीवर मात करून उच्चशिक्षण घेत ते विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांच्या विचारांचा देशाच्या आर्थिक धोरणांवर अमीट ठसा उमटला. मनमोहनसिंग पंतप्रधान व मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आम्ही नेहमी एकमेकांशी संवाद साधत होतो. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

नरेंद्र मोदी,
पंतप्रधान

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर ते देशाचा अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी हिंदुस्थानच्या शासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली.

अमित शहा,
गृहमंत्री

मनमोहन सिंग यांनी प्रचंड ज्ञान आणि सचोटीने भारताचे नेतृत्व केले. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल समज देशाला प्रेरणा देत होती. मनमोहन सिंग यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची असलेली सखोल जाण यातून देशाला प्रेरणा मिळते. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यापैकी लाखो जण त्यांना अभिमानाने आठवणीत ठेवतील.

राहुल गांधी,
विरोधी पक्षनेता, लोकसभा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणार्‍या पिढ्यांसाठी अक्षय प्रेरणास्रोत राहील. ईश्‍वर डॉ. मनमोहन सिंग यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!

शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार)

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ गमावला आहे. मी एक आजीवन ज्येष्ठ सहकारी आणि विचारवंत गमावल्याबद्दल शोक व्यक्त करतो. कामगार मंत्री, रेल्वे मंत्री आणि समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात काम करता आले याचा मला अभिमान आहे. राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे अतुलनीय योगदान देशाच्या इतिहासात कायमचे कोरले जाईल.

मल्लिकार्जुन खरगे,
काँग्रेस अध्यक्ष

देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. देशाच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपुल लेखनही त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील.

देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री

अमेरिकेकडूनही शोक प्रस्ताव
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर अमेरिकेकडूनही शोक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. उत्कृष्ट चॅम्पिअन असा सिंग अशा शब्दात डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख करण्यात आला आहे. भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीचे चॅम्पियन म्हणजे मनमोहन सिंग होते. दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी सिंग यांनी प्रयत्न केले होते.
Exit mobile version