| जळगाव | प्रतिनिधी |
गिरीश महाजन यांनी राजकारण करू नये. जर, तुम्ही राजकारण केल तर, तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील अडचणीत येऊ शकतात. सरकारसोबत आमचे काय ठरलं आहे हे गिरीश महाजन यांना माहित आहे. त्यामुळे माहीत नसल्याचे त्यांनी नाटक करू नये. आमच्या जीवावर आमदार झाला आहात, तुम्हाला घरी पाठवायला वेळ लागणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी महाजन यांना दिला.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, असे वक्तव्य महाजन यांनी केले होते. सोमवारी मनोज जरांगे यांनी जळगावमधून महाजनांसह सरकारला प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून सरकारला 40 दिवसांचा वेळ आपण दिला होता. पुढे त्यांनी आणखी 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला तोही दिला. आता सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे जरांगेंनी ठणकावले आहे.
आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात. तुम्हाला खूप मिळालं असेल. पण, आरक्षणासाठी आमचे लेकरं टाहो फोडात आहेत. त्या छगन भुजबळचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय कराल, तर तुम्हाला हे जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.