| जालना | प्रतिनिधी |
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 9 दिवस उपोषण केल्यानंतर बुधवारी उपोषण मागे घेतलं. मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत, असं जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारालाही इशारा दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, माझं उपोषण सुरु असताना लोकांचा त्रास मला सहन होत नाहीये, कोर्टाचा मी सन्मान करतो. उपोषण करुनही आता काही फायदा नाही. आता उपोषण स्थगित करत आहोत. ’’सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तरी चालेल, आपण सत्तेत जाऊ, आपले लोक सत्तेत गेले पाहिजेत. आपण सरकारला संधी दिली होती, पण आता त्यांनी वेळ चुकवली आहे. समाजाच्या महिला, मुलं, श्रीक्षेत्र नारायणगड हे सरकारपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे.’’