। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
धनंजय मुंडे खूपच घोटाळेबाज, लफडेबाज असून तो राज्याला लागलेला दुर्दैवी डाग आहे. गोरगरीबांच्या ताटात माती कालवणे त्यांचा पिंड आहे. इतका भ्रष्टाचार एक मंत्री करत असेल तर त्याला सरकार जवळ करते कसे, हा मोठा प्रश्न आहे. सरकार जर कारवाई करणार नसेल तर जनतेला न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना केले.
तसेच, मीही आता मागे लागणार आहे. मीही सगळा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. मी सुट्टी घेऊन आता टप्प्याटप्प्याने कामाला लागणार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले. धनंजय मुंडे हे आरोपी फरार करायला फिरत आहेत. बाहेरचे आणि आतले आरोपी सांभाळत आहेत. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्यासाठी स्वतः काम करत आहेत, असा दावाही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. तसेच, धनंजय मुंडेंचीसुद्धा ईडी चौकशी लागली पाहिजे. हे पैसे कुठून आले? प्रॉपर्टी कुठून आली? कोणत्या योजनेत भ्रष्टाचार केला आहे? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी यावेळी केली.