आयपीएलच्या धर्तीवर मिळणार अलिबागमध्ये क्रिकेटचा आनंद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गतवर्षीपासून पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी झालेली पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा राज्यभर गाजली. पीएनपी चषकाचे हे दुसरे वर्ष आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनामुळे याहीवर्षी स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

पीएनपी चषकाचे अनावरण व खेळाडूंचा लिलाव सोहळा बुधवारी (दि.5) कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे आदी मान्यवरांसह संघमालक, संघाचे व्यवस्थापक, कर्णधार उपस्थित होते.
यापुढे जयंत पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, शेतकरी, कामगार व कष्टकर्यांचे कैवारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर ही स्पर्धा पाहिली. पीएनपी चषकाचे दर्जेदार असे सामने झाले. क्रिकेटचा दर्जा व व्यवस्थापनाबाबत राज्यातून भरपूर कौतुक करण्यात आले. पीएनपी चषकाचे हे दुसरे वर्ष आहे. क्रिकेट खेळाडूंना एक चांगली संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनादेखील अलिबागमध्ये आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेटचे सामने पाहावयास मिळत असल्याचा आनंद आहे, असे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगितले.
शेकापचे युवा नेते नृपाल पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे दुसरे पर्व आहे. अलिबाग, रोहा, मुरूड या तीन तालुक्यापुरती मर्यादित ही स्पर्धा असणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला पाच लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला तीन लाख रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये व चषक तसेच विविध आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
घरबसल्या पाहता येणार स्पर्धा
ही स्पर्धा ऑनलाईन घरबसल्या बघण्याची व्यवस्था केली आहे. अलिबागसह रायगड जिल्हा, राज्य, देशाबाहेरील क्रीडाप्रेमींना या स्पर्धेचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे. एक वेगळा उत्साह यानिमित्ताने दिसून आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगे यांच्याकडून करण्यात आले आहे.
मुरूड डिफेन्डर्स, शहापूर स्मॅशर्स, खंडाळे स्टॅलिअन्स, आंबेपूर टायगर्स, रामराज रायडर्स, चौल चेसर्स, रेवदंडा रॉयल्स, वळके अवेंजर्स, बेलोशी बिग बुल्स, नांदगाव निंजास, मापगाव मार्वल्स, मुरूड थंडर्स, कुर्डूस किंग, चेंढरे चॅम्पियन, सारळ स्ट्रायकर्स, उसरोली वंडर्स, खारगाव हंटर्स, वरसोली चॅलेंजर्स, थळ टायपहुन्स, आवास अल्फास, अलिबाग वॉरिअर्स, अलिबाग सुपर किंग, रोहा रेंजर्स, राजपुरी पॅथर्स या निमंत्रित 24 संघांचा स्पर्धेत समावेश असणार आहे.
पीएनपी चषकाचे हे दुसरे पर्व आहे. गतवर्षीसुद्धा या स्पर्धेचे नियोजन उत्तम केले होते. एकापेक्षा एक खेळ पहावयास मिळाले. माझा संघ अंतिम विजेता ठरला. त्यावेळी टीमच्या सर्व खेळाडूंसह अनेकांचे सहकार्य मिळाले. राज्यात पीएनपी चषकाचे नाव एक वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे.
सुरेश घरत,
संघमालक