मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
। नारायणगड । वृत्तसंस्था ।
कधी वाटलं नव्हतं या ताकदीनं सर्व एकत्र याल. नारायणगडावर हा न्यायाचा जनसमुदाय आला आहे. दुःखाकडून या समुदायाला आनंदाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत, तो कधीच जातीयवाद करत नाही. समाजात प्रत्येकाला सांभाळण्याचं आणि मदत करण्याचं काम या समुदायाने केलं आहे, असं वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंनी केलं आहे. त्यांनी शनिवारी (दि.12) नारायणगडावर दसरा मेळावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या मेळाव्यासाठी मराठा समाजाच्या अनेक लोकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी जरांगेंनी या लोकांशी संवाद साधला आहे. भाषणात मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आरक्षणाबाबतही त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी राज्य सरकार, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळांवर टीका केली. पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगेंनी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, या गडाची किमया आणि आशीर्वाद ज्याला मिळतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो. दिल्लीला जाऊन जे उलटले, त्यांना जनतेनं उलटवलं आहे, असं म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला.
मनोज जरांगे म्हणाले की, जर अडवणूक होणार असेल तर इच्छा नसतांनाही उठाव करावाच लागेल. आमच्या वाट्याला अन्याय का येत आहे. आम्ही काय पाप केलं? कुणीतरी आम्हाला सांगा. माझा समाज राज्य आणि देश पुढे जावा म्हणून झुंजला आहे. वेळ पडली तेव्हा तलवार हातात घेऊन लढला आहे. आचारसंहितेपर्यंत वाट पाहणार आहे. न्याय मिळाला नाही तर आचारसंहितेनंतर निर्णय घेणार आहे. तुमची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारचं. फक्त मी जे सांगेन ते पूर्ण क्षमतेने करायचं. आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण द्या. आरक्षण दिलं नाही तर तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला उलथं केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसेच आचारसंहिता लागेपर्यंत राजकारणाचा एक शब्दही बोलणार नाही, असदेखील त्यांनी सांगितलं आहे.