। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गरबा नृत्य कार्यक्रमाच्या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी पाचलमधील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी वैष्णवी माने हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वैष्णवीचे वडील प्रकाश माने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे वैष्णवीच्या मृत्यूला शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन जबाबदार असून, त्यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची, तसेच मुख्याध्यापक देसाई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. तक्रारीनुसार देसाई यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी देसाई यांना तत्काळ निलंबित करून पदमुक्त करण्याचे आदेश पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला दिले आहेत.