ध्रुव, ऐश्वर्या ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’चे मानकरी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील सर्व क्रीडा प्रकाराचे क्रीडापटू, क्रीडाप्रेमी, क्रीडा संस्था, संघटना आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित सर्वांचे एकत्र येऊन मुंबईतील क्रीडा जगताच्या भल्यासाठी झटणार्या क्रीडापटूंचे मुंबई स्पोर्ट्स हे एक मुक्त व्यासपीठ आहे. यातूनच गेल्या वर्षापासून ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ आणि ‘मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्कार देण्यास सुरवात करण्यात आली आहे.
‘मुंबई स्पोर्ट्स’ ही नफा न कमावणारी संस्था असून मुंबईतील पायाभूत क्रीडा सुविधा व क्रीडा संस्कृती सक्षम ठेवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे. 2010 सालापासून जय कवळी, महेंद्र चेंबूरकर, दिवंगत विनायक गायकवाड यांच्या पुढाकाराने बापू शरीफ, सुनील वालावलकर आणि दिवंगत वाली महमद यांच्या सहकार्याने मिळून सारे या बॅनरखाली मुंबईतील क्रीडाजगत एकत्र येऊ लागले आणि 2020 साली ‘मुंबई स्पोर्ट्स’ची स्थापना करण्यात आली. मुंबई स्पोर्ट्स संस्थेच्या कोअर कमिटीत अध्यक्ष आदिल सुमारीवाला, निमंत्रक जय कवळी, सदस्य जया शेट्टी, प्रदीप गंधे, उदय देशपांडे, सुदर्शन नायर, संजय शेटे, भास्कर सावंत, अरविंद प्रभू, नामदेव शिरगावकर यांचा समावेश आहे.
यावर्षी ध्रुव सितवाला (बिलियर्ड्स व स्नूकर) व ऐश्वर्या मिश्रा (अॅथलेटिक्स) ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’चे मानकरी ठरले आहेत. त्यांना 1 लाख व संमानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. रुजुता खाडे (जलतरण), सोनाली बोराडे (ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स), अक्षय करुणाकर शेट्टी (बॅडमिंटन) व कुणाल कोठेकर (ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक) हे ‘मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर, विशेष श्रेणी पुरस्कार नताशा जोशी (शूटिंग) यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार मुंबई क्रिकेट असो.चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार कुर्ल्यातील बंड सभागृहात गुरूवारी (दि.28) सायंकाळी वितरीत करण्यात येणार आहेत. यावेळी ‘स्पोर्ट्स कोड तारक कि मारक’ यावर सुध्दा चर्चा होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाल विविध खेळातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
ध्रुव सितवाला (बिलियर्ड्स व स्नूकर):
ध्रुव सितवाला याने 37 आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 2024 साली न्यूझीलंड ओपन आणि ऑकलंड ओपन बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 (सौदी अरेबिया) मध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच, वर्ल्ड मॅचप्ले बिलियर्ड्स (आयर्लंड) आणि ऑस्ट्रियन ओपन बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व कांस्यपदके मिळवली आहेत. त्याच्या करिअरमधील इतर प्रमुख यशांमध्ये 2023च्या जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके, तसेच पॅसिफिक आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स (2023) व पॅन-अम चॅम्पियनशिप (2019) यामध्ये रौप्यपदके जिंकण्याचा समावेश आहे.
ऐश्वर्या मिश्रा (अॅथलेटिक्स):
भारतीय अॅथलेटिक्समध्ये चमकणारे नाव भारतीय धावपटू ऐश्वर्या कैलाश मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. 2023च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 400 मीटर व्यक्तिगत स्पर्धेत रौप्य, मिश्र रिलेमध्ये सुवर्ण, तर महिला रिलेमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. तसेच, आशियाई क्रीडा स्पर्धेतही 400 मीटर महिला रिलेमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.