। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी।
सह्याद्रीच्या दर्या-खोर्यांत घनदाट जंगलामध्ये वसलेल्या कुंभवडे या गावात दुर्मीळ असलेल्या ’ब्लॅक पँथर’चे अस्तित्व पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. आठ महिन्यांपूर्वी तेरवण-मेढे परिसरातही ब्लॅक पँथर पाहायला मिळाला होता. त्यामुळे सह्याद्री डोंगररांगात ब्लॅक पँथरचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडेमधील जंगल भागात हा दुर्मीळ ब्लॅक पँथर पाहायला मिळाला आहे. वाहन आल्याचे पाहताच ब्लॅक पँथर झुडपांमध्ये लपू लागला होता. यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पँथरची छबी आपल्या मोबाइलमध्ये कैद केली. जैवविविधता अधोरेखितमार्च महिन्यातही तेरवण, मेढे येथील जंगलात ‘वाईल्ड वन’ या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ब्लॅक पँथर दृष्टीस पडल्याची घटना घडली होती. सह्याद्रीच्या डोंगररांगात पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याने येथील जैवविविधता अधोरेखित होत आहे.