मनू भाकरचे तिसरे पदक थोडक्यात हुकले

| पॅरिस | वृत्तसंस्था |

नेमबाज मून भाकरने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तिने तिसऱ्यांदा पदक मिळवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही.

मनू भाकर 25 मीटर प्रकारात आणखी एक पदक घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.  10 मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक आणि 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक अशी दोन कांस्यपदकं तिने नावावर करून इतिहास घडवला. इतिहासात भारतासाठी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. 1900 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली होती. त्यानंतर अशी कामगिरी करणारी मनु ही पहिलीच भारतीय ठरली होती. आज तिला एक पाऊल पुढे टाकण्याची संधी होती, परंतु शूट ऑफमध्ये तिचे ऐतिहासिक तिसरे पदक थोडक्यात हुकले.

मनु भाकरची कामगिरी
मनुने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात एक सुवर्ण ( 2023) व एक कांस्य ( 2022 ) पदक जिंकले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत तिच्या नावावर 9 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्यपदकं तिने जिंकली आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण, ज्युनियार जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनियर वर्ल्ड कप, जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धा, युवा ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा अशा विविध स्पर्धा मनुने गाजवल्या आहेत.

मनु भाकरने तीन सीरिजमध्ये 10 गुण घेताना दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. पण चौथ्या सीरिजनंतर मनुची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आणि ती व्हिएतनामच्या खेळाडूसह 13 गुणांसह बरोबरीत राहिली. पाचव्या सीरिजमध्ये मनुने पाच अचूक लक्ष्य भेदून जबरदस्त पुनरागमन केले आणि 18 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आली. हंगेरियाची मेजोर व्हेरॉनिका 19 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. सहाव्या सीरिजमध्ये मनुने पाचपैकी चार शॉट्स अचूक साधले आणि 22 गुणांसह ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. पण, तिला अन्य नेमबाजांकडून टक्कर मिळत होती आणि एक चूक कोणालाही महागात पडणारी ठरली असती. फ्रान्सच्या कॅमिल व मेजॉर हे मनुला टक्कर देत होते आणि सातव्या सीरिजमध्ये मनुने पुन्हा एकदा पाचपैकी चार शॉट्स अचूक मारून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली होती. पण, फ्रान्सची कॅमिल 26 गुणांसह मनुसह बरोबरीत होती. कोरियाची यांग जिन 27 गुणांसह अव्वल स्थानी होती. 8 व्या सीरिजमध्ये मनुचे दोन शॉट्स चुकले आणि ती 28 गुणांसह तिसऱ्या स्थानी गेली. यावेळी हंगेरीच्या मेजॉर व्हेरॉनिका (28) हिच्यासह शूट ऑफ झाला. त्यात मनु हरली आणि तिला चौथ्या स्थानावर समाधानी रहावे लागले.

Exit mobile version