फिफा विश्वचषकावर उष्माघाताचे संकट?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

फुटबॉल विश्वचषकाला सुरूवात होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 1994 नंतर पहिल्यांदाच नॉर्थ अमेरिकेतील ऐन उन्हाळ्याच्या हंगामात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. एकूण 48 देशांचे फुटबॉल संघ या फिफा विश्वचषकात सहभागी होणार आहेत. नॉर्थ अमेरिकेत सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन या हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला आहे. 1994 नंतर प्रथमच फुटबॉल विश्वचषकावर तीव्र उष्णतेचे सावट असून हे मानवनिर्मित आहे. निसर्गात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने हवामानात बदल झाल्याचे संस्थेने सांगितले. फिफा विश्वचषकाचे अनेक सामने हे उष्ण व दमट वातावरणात होणार आहेत. या वातावरणाचा फक्त खेळाडूंवरच नव्हे, तर स्टेडियममध्ये उपस्थित असणारे प्रेक्षक, कर्मचारी, अधिकारी यांच्या आरोग्यावरही परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोणत्या दिवशी, कोणत्या सामन्यात, सर्वाधिक दमट व उष्ण वातावरण असेल, याबाबत काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 11 जून ते 19 जुलै या दरम्यान होणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामधील 16 ठिकाणी या स्पर्धेचे सामने रंगणार आहेत. इम्पेरियल कॉलेज लंडनमधील संशोधकांनी वेट बल्ब ग्लोब टेम्परेचरचा अभ्यास केला आहे. सामने होणार असलेल्या ठिकाणी उष्णता, सूर्यप्रकाश, हवा कशी राहील याबाबतचा अभ्यास करण्यात आला. त्याचा मानवी शरीरावर कसा परिणाम होईल, याचे काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

या अभ्यासात 1994 च्या तुलनेत आजच्या हवामानात काय बदल झाले आहेत याचा अभ्यास करण्यात आला आहे. फिफा विश्वचषकातील 104 सामन्यांपैकी 25 टक्के सामने हे 26 अंश सेल्सिअस तापमानात खेळले जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस असू शकते. उत्तर गोलार्धातील देशांमध्ये ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या सामन्यांवर हवामान बदलाचा गंभीर परिणाम जाणवू शकतो.

Exit mobile version