। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.4) झालेल्या चक्री वादळाने नागरिक चांगलेच हादरले असून तळवली दांडवाडी येथील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत तळवली येथिल अतुल मालकर यांनी तातडीने या वाडीला भेट देऊन तात्काळ पंचनामे करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी बत्ती गुल झाल्याने अनेकांना रात्र अंधारातच काढावी लागली आहे.
एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस हा नागरिकांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी निसर्गापुढे सर्वच हतबल होत आहेत. या चक्री वादळामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. यावेळी दांडवाडी येथील हरिश्चंद्र वाघे, अनंत वाघे, रामदास पवार, बबन वाघे, मोहन हिलम, अनंता हिलम, दिलीप पवार, नकुल वाघे, सदा वाघे, विठोबा जाधव, प्रभाकर वाघे, भीमा वाघे, शिवाजी वाघे, परशुराम पवार, शंकर पवार, सुरेश जाधव, रघुनाथ जाधव व गणेश कातकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचानामे करण्यात आले आहेत. परंतु, यापूर्वी 2023मध्ये देखील असेच नुकसान झाले होते. मात्र, पंचनामे करुन सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नसल्यांची खंत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी झालेल्या चक्री वादळाने तालुक्यातील काही गावातील घरांचे नुकसान झाले असून तलाठी कामाला लागले आहेत. सोमवारपर्यंत सर्व पंचनामे पुर्ण करुन शासनाकडे पाठविले जातील.
– अभय चव्हाण, तहसीलदार, खालापूर
चक्री वादळामुळे गावातील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामे झाले असून त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी.
– हरिश्चंद्र वाघे, ग्रामस्थ, तळवली दांडवाडी