चालकांवर राहणार पोलिसांची नजर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
खासगी वाहनातून धोकादायकरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड पोलिसांनी पावले उचलली आहेत. शाळकरी मुलांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक करणार्या चालकांवर आता पोलिसांची नजर राहणार आहे.
कर्जत तालुक्यातील एका शाळेतील 20 अल्पवयीन विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.4) एका खासगी ओमनी कारमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. त्याबाबतचा व्हीडीओ पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळाला होता. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करण्याची सुचना केली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी माहिती घेऊन संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळकरी मुलांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर पोलिसांमार्फत नजर ठेवली जाणार आहे. पोलीस अधीक्षक सोमनात घार्गे यांनी याबाबत जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना सुचना केली आहे. प्रवासी वाहतूक करणार्या खासगी वाहनांवर पोलिसांद्वारे कारवाई केली जाणार आहे.