कारगो वाहतुकीचा अनेक गावांना फटका

मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडीत


| अलिबाग | प्रतिनिधी |

कुरुळ ते उसर अशी कारगोची वाहतुक गुरुवारी सकाळी करण्यात आली. कुरुळपासून रामराजपर्यंतच्या गावांतील नागरिकांना या वाहतुकीचा मोठा फटका बसला. सकाळी तीन वाजल्यापासून दुपारी वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. सकाळी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चौल मार्गे प्रवास करण्याची वेळ आली.

उसर येथील गेल कंपनीमध्ये पॉलिमर प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक अलिबागहून केली जात आहे. कंपनीतील साहित्यांची वाहतूक करताना अडथळे ठरणाऱ्या बेलकडे ते घोटवडे रस्त्यावरील दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आली. गुरुवारी सुमारे 32 फुट उंच व बारा फुट रुंद असलेल्या कारगोची वाहतूक कुरुळ येथून उसरपर्यंत करण्यात आली. यावेळी कोणताही दुर्घटना घडू नये यासाठी अलिबाग रोहाकडील वाहतूक चौलमार्गे वळविण्यात आली. त्यामुळे रोहाकडून अलिबागकडे व अलिबागकडून रोहा कडे जाणाऱ्या नागरिकांना चौल मार्गे जाण्याची वेळ आली. त्याचा फटका मल्याणपासून ढवरपर्यंतच्या गावांतील नागरिकांना बसला. विद्यार्थ्यांना सकाळी शाळा, महाविद्यालयात जाताना उशीर झाला. दरम्यान पहाटे दीड वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत विद्युत सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे सात ते आठ तास नागरिकांचे हाल झाले. सकाळी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अंधारामुळे मोठी गैरसोय झाली.

Exit mobile version